Saturday, 4 October 2025

मदत...?

कोण्या जन्माच पाप सारं

सगळं आकरित घडतंय

थांबावं ना रे पांडुरंगा

का रात्रंदिस हा पडतंय?


हातातोंडाशी आलेला घास

अगदीच ओढून घेतलाय

जगाला पोसणाऱ्या राजाचा

आज संसार उघडा पडलाय


जे ते येऊन बांधावर

म्हणे नुकसान पाहणी करतय

मदत नाहीच कवडीची

तेवढं  बाईट देऊन जातय


अहो मायबाप सरकार

नुसत्याच घोषणा करताय

की उभा राहिल त्याचा कणा

असं काहीतरी देताय


वेळ येऊन ठेपली आता

ठरलं तसंच करा

ओला दुष्काळ जाहीर करून

तेवढी कर्जमाफी करा

Saturday, 14 June 2025

माझ्या कविता 80

नाही आम्हा भय कशाचे 

ना अंधाराची तमा 

वाटत राहू ज्ञान फुले

अन् तेवत ठेवू शमा


असे शस्त्र कलम आमचे 

लढूया न्यायासाठी

जोडत राहू हात हजारो 

एक संघ शक्तीसाठी


करुनी बिमोड संकटाचा 

पुढे पाऊल टाकत जाऊ 

पायी तुडवून घनवादळे

यश शिखरे चढत राहू 


पेरत राहू मंत्र यशाचे 

आणि भरत जाऊ स्फुरण

एकवटावी शक्ती सारी 

दाही दिशा येण्या शरण

Friday, 16 May 2025

माझ्या कविता 79

सहजीवनाची वर्ष आठ

सहज सरून गेली

सुखी, पवित्र नात्याची

नाळ घट्ट जुळत गेली


असो संकट वा संघर्ष

हिंमत लढण्यास दिली

क्षणोक्षणी असते साथ 

जणू सोबतीस सावली


आयुष्याचे प्रत्येक पाऊल

हसत हसत पडावे

दिवे दोनही श्वासांचे

अंती सोबत विझावे

Thursday, 17 April 2025

माझ्या कविता 78

व्यक्ती तशा प्रवृत्ती 

गोष्ट अगदी खरी आहे 

दुसऱ्यांना पाण्यात पाहणं 

काहींची तर थेअरी आहे


सोडत राहायचे फुके बाण

उगाच अर्धवट ज्ञानाचे 

आपण म्हणजे थोर पंडित 

अन् स्वभाव मोजायचे लोकांचे


दुसऱ्यांची काढून मापं

अक्कल तारे तोडायचे

एका असुरी सुखासाठी

निव्वळ तोंडावर पाडायचे


गुलामांनी गुलाम राहावं

वृत्ती बाकी खास आहे

आदर्श समानतेला सुद्धा

स्वार्थीपणाचा वास आहे

Thursday, 10 April 2025

माझ्या कविता 77

विणत जावो प्रेम धागे

अन् नाते घट्ट जुळावे 

तुझ्या न माझ्या प्रेमाचे

असे गाणे सुरेख गावे


उधळत राहो रंग हजारो 

अन् जीवन रंगीन व्हावे

तुझे नि माझे चर्चे बाकी

हर एका ओठी यावे


बहरत जावो बाग आपली

अन् फुले फुलत राहावी

काट्यांनाही शरम यावी 

तशी संगत गुलाबी व्हावी


असे असावे प्रेम निखळ

अन् जगात मिसाल व्हावी

तुझ्या नि माझ्या बंधनाची

कोणी अमर कथा लिहावी