Saturday, 31 March 2018

माझ्या कविता 21


मी इथेच पाहिलं
कधी काळी
सत्य, अहिंसा, प्रेम
स्वच्छंदी जगणं,
अगदीं मोकळा श्वास
अन् मायेची सावली

माझा ही होतं
एक सुंदर गाव
ना कोणती जात 
वा धर्म भेदभाव
इथे नांदली शांतता 
नव्हतेच कुणाचे वैर
पण काय काळ आला 
आता झाले सगळेच गैर

कुणी रोज पेरतायेत विष 
कुविचार अन भेदांचे
देऊनी हातात झेंडे 
आपापल्या रंगाचे
उचलुनी जातीचे शस्त्र
 पेटवतायेत निखारे असमतेचे

हा वेडा समाज माझा 
पेटतच जाणार
ते वाहतील तसा 
वाहत राहणार
आता तरी थांबा जरा 
विचार करून बघा
माणूस आहात जरा, 
माणूस होऊन जगा