Friday, 31 July 2020

माझ्या कविता 53

सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं? धृ.

सुखी संसाराचे स्वप्न पाहत
बाप कित्येक रात्री जागला
करून रक्ताचं पाणी 
तो पोरांसाठी राबला
मांडून बाजार शिक्षणाचा
त्यांनी मात्र हवं तसं लाटलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?       1

म्हटला होतात एकदा तुम्ही
अभ्यास करून हो सेट-नेट
अहो प्राध्यापकीचा सुद्धा बरं का
वाढत चाललाय रेट
नोकरीच्या शोधात मात्र
आयुष्याचं गणित हुकलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?       2

विनाअनुदानाचा शिक्का त्यांनी
आमच्या माथी मारला
इथंच खरंतर प्रत्येकजण
डाव आयुष्याचा हरला
जेव्हा आला प्रश्न पोटाचा
हे क्षेत्रच नकोसं वाटलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?        3

कसली तुमची संघटना
फक्त तुमचेच प्रश्न मांडणार
महागाई भत्ता पगार पेन्शन
यासाठीच मोर्चे काढणार
गरजवंताला नसतेच अक्कल
एवढं मात्र पटलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?        4

काय तर म्हणे सरकार आता
नवीन धोरण राबवणार
विस्कटलेली घडी शिक्षणाची
एका चौकटीत बसवणार
देऊन अधिकार त्यांना
फक्त रान मोकळं केलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?       5

Thursday, 30 July 2020

माझ्या कविता 52

सांजकाळी एकांतवेळी
मन घुटमळते कुणीकडे
घेत शोध कुणाचा?
असे भिरभिरते चोहीकडे

चालून झालीत काही पाऊले
घ्यावा वाटतो विसावा
जरा थांबतो कुठेतरी
मुक्त पाझरण्या आसवां

बंद पिंजऱ्यात काही वेदना
छळून जातात मनास रे !
घालावी फुंकर कुणीतरी
अनं दुःख विरावे वार्‍यात रे !