Sunday, 27 October 2024

विचारमाला 1

 आज आधुनिक जगात वावरताना माणसाने स्वतःसाठी हवी असणारी प्रत्येक गोष्ट अगदी सुलभ करून घेतली तशी त्याने विज्ञान, तंत्रज्ञान अशा एक ना अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली खरी पण आजही मनाला अनेक प्रश्न पडतात, माणूस प्रगतीच्या प्रत्येक दिशेने पाऊल टाकत असतानाच त्याच्याकडे असलेली विचार प्रगल्भता कुठेतरी कमी तर होत नाही ना असा प्रश्न पडणं ही साहजिकच आहे. माणूस कुठेतरी अहंकार, पद, प्रतिष्ठा वा पैसा याकडेच जास्त पळताना दिसतोय.  इथे मात्र भावनेला हवी तशी किंमत उरत नाही बरं का! बालपणापासूनच गुरुजन, थोरा-मोठ्यांनी याबरोबरच अनेक पाश्चिमात्त्य विचारवंतापासून तर ते भारतीय विचारवंत यांनी ज्ञान, तत्त्वज्ञान, शास्त्र, परंपरा अशा वैचारिक खजिन्यांचे दर्शन घडविले आणि तसे संस्कारही रुजले गेले पण खऱ्या अर्थाने याचा कुठेतरी विसर तर पडला नाही ना हा सुद्धा विचार मनात सतत घोंगावत असतो. सर्वधर्मसमभाव, समानता, मानवता, प्रेम, दया, आपुलकी व तसेच न्यायिक भूमिका फार दुर्मिळ झाल्यासारखे वाटते. माणसं तर जे सत्यच नाही अशा नश्वर असलेल्या गोष्टींशी जास्त जवळीक साधत आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक पाऊलावर इतिहास नेहमीच भूतकाळाची जाणीव करून देत असतो. पद, सत्ता अथवा साम्राज्य याचाही अंत झाला, होत आहे, आणि भविष्यात होईलही. या सर्व गोष्टी चिरंतन टिकणाऱ्या  तर मुळीच नाहीत याची कुठेतरी जाणीव होणे सुद्धा अत्यावश्यक व्हावी हीच अपेक्षा करणं सुद्धा वावगं ठरणार नाही. काय तर म्हणे, ब्रिटिश साम्राज्यामध्ये ' सूर्य ही मावळत नसे ' ही जरी म्हण वाटत असली तरी आज त्या साम्राज्याचा साधा नामोल्लेख सुद्धा होताना दिसत नाही एवढेच काय रावणाची तर संपूर्ण लंका सोन्याची होती ती सुद्धा काळाच्या ओघात नामशेष झालीच की! हे सर्व चित्र आपल्यासमोर असतानाही माणूस हा कोणत्या भ्रमात जगत आहे याची कुठेतरी मीमांसा होणे सुद्धा गरजेच वाटतं. अनेक पुस्तकातून हाही उलगडा होतो की,  'माणसाने माणसाशी माणसासम वागावे ' पण आजच्या युगामध्ये हे फार प्रकर्षाने दिसत नाही. मग माणसाला कशाचा उन्माद आला देव जाणे! आपल्या मायभूमीतील तमाम थोर विभूती, संत मायबाप यांनी तर सदैव मानवतेचा संदेश दिला. कामांमध्ये ईश्वर, माणसांमध्ये देव, लोकसेवेतच खरे कर्मफळ यासारखे मानव हिताचे लोककल्याणकारी संदेश दिले अथवा तसे समर्पक कार्यही केले मग या संत मायबापाच्या विचारांचे आचरण व्हायलाच हवे पण डोळ्यासमोर अहंकाराची पट्टी बांधलेल्या विचारशून्यता असलेल्यांचा स्वतःमधील विवेक जागा व्हावा हीच अपेक्षा.

Copyright @Ram SB Korde