बाप सांगत लोकांना
माझं पोर शिकणार
दिवसरात्र राबलो
याचं चीज होणार
मला सुद्धा वाटायचं
आपण मोठं होणार
सुखी होतील मायबाप
असलं शिक्षण घेणार
पोटाला चिमटा काढत
तो मात्र राबायचा
शोधत दिवस सुखाचा
रात्रभर जागायचा
पाहून घाम बापाचा
मी ही लढत गेलो
शिक्षण पुर्ण करून
मग बेरोजगार झालो
घेऊन कागद डिग्रीचे
तसा दारोदार फिरत होतो
भरेल पोट सुखाने
नोकरी अशी शोधत होतो
हातात घेऊन कागद
नकार मात्र द्यायचे
आहे का वशिला
मुद्दामहून विचारायचे
बाकी नसेल वशिला
तूम्हाला पण घेणार
व्यवहार मात्र रोखठोक
टेबलाखालून होणार
कसलं बरं शिक्षण
फक्त गुलाम व्हायचं
विकून सर्व स्वाभिमान
मेल्यासारखं जगायचं
शिकून सुद्धा बरं का
शिकल्या सारखं वाटत नाही
फक्त विचाराच्या भाकडकथा
इथं पोट मात्र भरत नाही