Friday, 20 December 2024

माझ्या कविता 73

लाडकी बहीण, भाऊची

माया बाकी अफाट आहे

देवाभाऊ, भाई,  दादाची

युती अगदी  सुसाट आहे


मोफत वीज, पेन्शन, प्रवास

योजना विम्याची खास आहे

रस्ते, सिंचन, नोकरी, शिक्षण

सुखी, समृद्ध विकास आहे


एक है तो सेफ घोषणा 

जरी जादुई कमाल आहे

जनतेच्या नसानसात मात्र

सळसळणारं हिंदुत्व आहे


इथं आघाडीतील बिघाडीला

कारणं जरी गौण आहे

पराभवाच्या छायेत मात्र

सगळेच दिग्गज मौन आहे


चिंतन, मंथन बरंच काही

फक्त अंधश्रद्धा आहे

तसं अपयशाचं खापर

अन् दोषी ईव्हीएम आहे

Sunday, 27 October 2024

विचारमाला 1

 आज आधुनिक जगात वावरताना माणसाने स्वतःसाठी हवी असणारी प्रत्येक गोष्ट अगदी सुलभ करून घेतली तशी त्याने विज्ञान, तंत्रज्ञान अशा एक ना अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली खरी पण आजही मनाला अनेक प्रश्न पडतात, माणूस प्रगतीच्या प्रत्येक दिशेने पाऊल टाकत असतानाच त्याच्याकडे असलेली विचार प्रगल्भता कुठेतरी कमी तर होत नाही ना असा प्रश्न पडणं ही साहजिकच आहे. माणूस कुठेतरी अहंकार, पद, प्रतिष्ठा वा पैसा याकडेच जास्त पळताना दिसतोय.  इथे मात्र भावनेला हवी तशी किंमत उरत नाही बरं का! बालपणापासूनच गुरुजन, थोरा-मोठ्यांनी याबरोबरच अनेक पाश्चिमात्त्य विचारवंतापासून तर ते भारतीय विचारवंत यांनी ज्ञान, तत्त्वज्ञान, शास्त्र, परंपरा अशा वैचारिक खजिन्यांचे दर्शन घडविले आणि तसे संस्कारही रुजले गेले पण खऱ्या अर्थाने याचा कुठेतरी विसर तर पडला नाही ना हा सुद्धा विचार मनात सतत घोंगावत असतो. सर्वधर्मसमभाव, समानता, मानवता, प्रेम, दया, आपुलकी व तसेच न्यायिक भूमिका फार दुर्मिळ झाल्यासारखे वाटते. माणसं तर जे सत्यच नाही अशा नश्वर असलेल्या गोष्टींशी जास्त जवळीक साधत आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक पाऊलावर इतिहास नेहमीच भूतकाळाची जाणीव करून देत असतो. पद, सत्ता अथवा साम्राज्य याचाही अंत झाला, होत आहे, आणि भविष्यात होईलही. या सर्व गोष्टी चिरंतन टिकणाऱ्या  तर मुळीच नाहीत याची कुठेतरी जाणीव होणे सुद्धा अत्यावश्यक व्हावी हीच अपेक्षा करणं सुद्धा वावगं ठरणार नाही. काय तर म्हणे, ब्रिटिश साम्राज्यामध्ये ' सूर्य ही मावळत नसे ' ही जरी म्हण वाटत असली तरी आज त्या साम्राज्याचा साधा नामोल्लेख सुद्धा होताना दिसत नाही एवढेच काय रावणाची तर संपूर्ण लंका सोन्याची होती ती सुद्धा काळाच्या ओघात नामशेष झालीच की! हे सर्व चित्र आपल्यासमोर असतानाही माणूस हा कोणत्या भ्रमात जगत आहे याची कुठेतरी मीमांसा होणे सुद्धा गरजेच वाटतं. अनेक पुस्तकातून हाही उलगडा होतो की,  'माणसाने माणसाशी माणसासम वागावे ' पण आजच्या युगामध्ये हे फार प्रकर्षाने दिसत नाही. मग माणसाला कशाचा उन्माद आला देव जाणे! आपल्या मायभूमीतील तमाम थोर विभूती, संत मायबाप यांनी तर सदैव मानवतेचा संदेश दिला. कामांमध्ये ईश्वर, माणसांमध्ये देव, लोकसेवेतच खरे कर्मफळ यासारखे मानव हिताचे लोककल्याणकारी संदेश दिले अथवा तसे समर्पक कार्यही केले मग या संत मायबापाच्या विचारांचे आचरण व्हायलाच हवे पण डोळ्यासमोर अहंकाराची पट्टी बांधलेल्या विचारशून्यता असलेल्यांचा स्वतःमधील विवेक जागा व्हावा हीच अपेक्षा.

Copyright @Ram SB Korde

Sunday, 18 August 2024

माझ्या कविता 72

असे कसे वागणे यांचे 
आता डोईजड झाले
बिघडलेल्या औलादीला 
मार शब्दाचे फार झाले

बस झाल्या मेणबत्या
पेटवून न्याय होत नाही 
दोन दिवसाची आग सुद्धा 
फार काळ जळत नाही

येतात, जातात आत-बाहेर 
त्यांना काहीच फरक पडत नाही 
दलाल आहेत ना जागोजागी 
मग बातमी सुद्धा होत नाही

घडवले तिच्या न्यायासाठी 
म्हणे रामायण, महाभारत 
येतील का ते राम-कृष्ण
तिच्या न्याय, अब्रूसाठी परत

Thursday, 28 March 2024

माझ्या कविता 70

बोलू लागले डोळे आज
निखळ प्रेमाची भाषा 
ओढ अंतरी मनोमनी
लाजरी बेधुंद नशा

हवा-हवासा नाजूक स्पर्श
साद घाली वारा
सोबतीस जणू चंद्र-चांदण्या
अन् सुगंधी फुल पसारा

मी न राहिले माझी आता 
जीव गुंतला तुझ्यात रे!
रोम-रोम भिजले अंग 
पाऊस तुझ्या प्रेमाचा रे!

Friday, 1 March 2024

माझ्या कविता 71

मज वंदनीय अती प्रिय
किती मधुर रसाळ वाणी

नसानसात भरते स्फुरण
गाता शौर्याची गाणी

सळसळते रक्त ऐकुनी
यशोगाथा माय मराठी

दऱ्या खोऱ्यात घुमतो
गर्जतो निनाद मराठी


Monday, 19 February 2024

माझ्या कविता 69

कविता म्हणजेच 
नसतोच काही
फक्त लेखणीचा खेळ
गुंफाव्या लागतात 
भाव-भावना
जमवूनी शब्दांचा मेळ

कविता म्हणजेच 
नसतेच बरं
फक्त कागदावरची शाई
कविता जणू 
श्वास कवींचा
अंतरी अथांग वाहत राही

कविता म्हणजेच
नसते रेखन वा
गर्दी अमाप चित्रांची
कविता असतेच
खाण नवरस
कधी मुक्त उधळण रंगांची

देह जाळूनी 
द्यावा लागतो 
एक आकार कवितेला
कविता असतेच
समाज आयना 
देते एक अर्थ जगण्याला