Sunday, 24 December 2023

माझ्या कविता 68

कुणा भजावे कुणा पुजावे
हल्ली उकल होत नाही
या हरवलेल्या गर्दीमध्ये
मन अंतरी शोधत राही

काय कसले संचित आपले
ज्ञान मात्र पुरेसे नाही
धर्म-कर्माच्या वाटेवरही
कुणीच सोबतीस नाही

सोडावी लागतात क्षणोक्षणी
काही आयुष्यातील कोडी
सर करायचीय अवघड वळणे
ही जाण असावीच थोडी

पाप-पुण्याच्या चक्रामधले
आपण प्रवासी सारे
क्षणभंगुर हा देह-प्राण
हा अर्थ समजून घ्या रे

कुणा भजावे कुणा पुजावे
कोडं जरी अनंत आहे
निरंकार तो स्वामी जगाचा
वास अंतरी नित्य आहे

Friday, 3 November 2023

माझ्या कविता 67

आयुष्याच्या ऊन-सावलीत
जरी दाटूनी कंठ आला
होताना मोकळ्या भावना
आसवांना रोखणार नाही

वाहतील काळोख वारे
प्रकाशवाट सुटणार नाही
रोखतील हात हजारो
पण संयम ढळणार नाही

जुळतील धागे सुखाचे
भरतील ओंजळी फुलांनी
क्षण आनंदी वेचण्याचा
अवसर सोडणार नाही

जरी शब्दाचे खेळ सारे
शब्द मिटणार नाही
जरी होईल मन भ्रमित
पण कलम हरणार नाही
                 

Thursday, 12 October 2023

माझ्या कविता 79

 किती आठवू दादा
तुमची आभाळभर माया
उन्हा पावसात होती
तुमच्या प्रेमाचीच छाया

काय काळ असा आला
अन् होत नव्हत केलं
लाख जनमाचं नातं
दादा पोरकं हो झालं

काय मागू पांडुरंगा
तू खुप काही दिलं
दाखवूनी माय बाप
चीच लाख जनमाचं केलं

 हवं तर पांडुरंगा 
माझं सारं पुण्य घे!
पण माझ्या बापाला फक्त
तुझ्या चरणी जागा दे!

Sunday, 11 June 2023

माझ्या कविता 66

लिहायचं असतं बरच काही
शब्द मात्र फुटत नाही
शोधत असतो नवीन काही
कविता मात्र जुळत नाही

कुठे घडतय वेगळं काही
पेपर तर तोच आहे
म्हणावं तसं वैचारिक आता
हल्ली कोणी छापत नाही

पिढी गुंतली मोबाईल मध्ये
वाचन वगैरे दिसत नाही
शिक्षणावर तर बोलणंच नको
कोणीच मनावर घेत नाही

खरंच काही काळ होता
नवीन शिकत राहायचो
गुरुजी म्हणतील तसंच
अगदी तंतोतंत पाळायचो

भूत वर्तमान भविष्याची
सांगड तशी होत नाही
कुठे कुणाला वेळ तेवढा
ऐकून मात्र घेत नाही

म्हटलं बरं किती तरी
कलम काही सुटत नाही
दोन शब्द लिहिण्याचा
मोह काही आवरत नाही

Thursday, 18 May 2023

माझ्या कविता 65

तुमच्यासाठी भाकरी तवा
जणू सारीपाटाचा खेळ
आम्ही पारावर चाखत राहतो
फोल विचाराची भेळ

तुमचीच नजर पायापाशी
कसा जमेल मेळ?
विकास फक्त कागदावर
अन टाळून न्यायची वेळ

कपडे, गमछे, रंग वेगळे
नीती मात्र सेम
बदलत राहायचे सोईने
ठरवून असतो गेम

भाऊ, दादाचे कट लावण्यात
हे सारी जिंदगी घालतय
हाती-पदरी नसतंच काही
फक्त कार्यकर्ताच असतंय

किती उचलल्या सतरंज्या
पर्वा कुणालाच नसते
इथे तुमच्या आयुष्याची
किंमत मात्र शून्य असते
           

Saturday, 7 January 2023

माझ्या कविता 64

अशी कोणती दुनियादारी 
फारच होतेयं तोटकी
सुखी, आनंदी, संस्कारी
माणसं उरलींत मोजकी

गावामधल्या पारावर
चार माणसं जमायची
नव्हती बरं शिकलेली
सुख दुःख वाटायची

जसा हरवला संवाद
माणूस एकटं पडलयं
प्रेम आपुलकी माया
फक्त कागदावर उरलंय

आधुनिकतेच्या नावाखाली
वाटेल तसं राहायचं
आपऱ्या चिपऱ्या कपड्यावर
अंग प्रदर्शन करायचं

संस्कृतीला पायी तुडवून
कसलं आलय शहाणपण
खोटं अस्तित्व, मृगजळ
उगाच मिरवतंय मोठेपण

माणसा मधला माणूस
नेमका केव्हा मिळेल?
जगावं फक्त दुसऱ्यासाठी
खरच आनंद मिळेल