Thursday, 22 November 2018

माझ्या कविता 26

काय तुझी नशा सखे
काही औरच आहे
जीव तुझ्यात माझा
जणू बेधुंद आहे


तूझ्या नसण्याने प्रिये
हर क्षण अबोल आहे
तू असतेस बाहूत जेव्हा
खरा स्वर्गभास आहे


वाटत असतं मनाला
तू सतत नजरेत असावी
होऊनी समरस तुझ्यात
जणू तू माझ्यात दिसावी

Monday, 4 June 2018

माझ्या कविता 25

सांजवेळी रम्य नयनी
चाले किरणांचा लपंडाव
घन निळ्या दर्याचा
भासे भयाण उग्र भाव

सळसळणाय्रा बेभान लाटा
अंधारलेल्या एकांत वाटा
पाहून त्याचे रूप आगळे
मनी दाटती क्रूर वादळे

दाहीदिशा घूमतो आहे
घन चौघडा आज
कुण्या दिशेने विजांनीही
पांघरला प्रखरतेचा साज

न जाणे आज काही
अनभिज्ञ घडणार आहे
मन होईल पल्लवित असं
अमृत सांडणार आहे 

Wednesday, 9 May 2018

माझ्या कविता 24

तुम्हीच सांगा बाप हो
आता जगावं कि मरावं
आम्ही मजबूर अशा
कुठं गाऱ्हाण मांडावं

तुम्हीच म्हणता मुलगी नको
टाका मारून तिला
होईल भार हलका
उगाच बोझा कशाला

झाला जरी जन्म माझा
लोकं येगळंच बघतात
नुसतीच कुजबूज चोहिकडे
उगा नाकं मुरडतात

मला सुद्धा वाटतं
आपण शाळेत जावं
शिकून सवरून सारं
एक सक्षम स्त्री व्हावं

माझ जगणं असं
सदा वचका खाली
म्हणे समाज साक्षर झाला
तरी नाही कोणी वाली

नको नुसतंच बाईपण
नको चूल मूल
मी सुद्धा जगावं
येईल का एखादा रुल! 

Monday, 30 April 2018

माझ्या कविता 23

तू आहेस दयासागर,
प्रेमाचा वर्षाव करणारी
अन् मायेची ऊब देणारी

तू आहेस त्याग
एक तेजस्वी प्रकाश
घन अंधारवाटा तेजोमय करणारी

तू सोसतेस अपार दुःख  
सतत झिजत राहतेस
अगदी मेणबत्ती सारखी

तू असतेस एक आधार
जणू घराचा खांब
आणि गुंफत जातेस आनंदाची फूले एका माळेत 

तू असतेस लेक, पत्नी आणि बहिण
आमची ऊर्जा,
खंबीर साथ सदैव न्याय देणारी

तू नसतेच लाचार वा अशक्त
तू आहेस एक शक्ती,
अजिंक्य शौर्य इतिहास घडवणारी

तू आहेस जिजाऊ, अहिल्या आणि सावित्री
 जिने घडवलाय कर्तृत्ववान इतिहास
पदोपदी तुझ्या शक्तीची जाणिव करुन देणारा

तू असतेस एक प्रेरणा
 जगण्याला दिशा देणारी
अन् जीवन सार्थ करणारी

Tuesday, 3 April 2018

माझ्या कविता 22

शिवरायांचा मर्द मावळा
हो जरासा जागा
पेटव मशाल क्रांतीची
हो या संघर्षाचा धागा

विसरलास स्वराज्य इतिहास
घडवलेला माझ्या राजाने
पेटून ऊठ पुन्हा एकदा
नवचेतना अन तेजाने

नकोच नुसता पेहराव
नको नुसतं  दिसणं
पेटव आग देहात तुझ्या
अन दाखव तुझ असणं

लढायची वेळ सरली केव्हाच
तू उचल लेखणी क्रांतीची
भर स्फुरण देहात त्यांच्या
वा शक्ती पुन्हा लढण्याची

शिक्षणाचं घेऊन अस्त्र 
समाजाला जागं कर
तलवारीस कलम भारी
स्वराज्याची पेरण कर

तू आहेस समाजाचं देणं 
हा विसर पाडू नकोस
तूझ्या देहातील आग मात्र
विझवून देऊ नकोस

वेळ आलीय गड्या 
ऊठ आता जागा हो
घे मशाल नव क्रांतीची
सत्य विचाराचा धागा हो.
                             

Saturday, 31 March 2018

माझ्या कविता 21


मी इथेच पाहिलं
कधी काळी
सत्य, अहिंसा, प्रेम
स्वच्छंदी जगणं,
अगदीं मोकळा श्वास
अन् मायेची सावली

माझा ही होतं
एक सुंदर गाव
ना कोणती जात 
वा धर्म भेदभाव
इथे नांदली शांतता 
नव्हतेच कुणाचे वैर
पण काय काळ आला 
आता झाले सगळेच गैर

कुणी रोज पेरतायेत विष 
कुविचार अन भेदांचे
देऊनी हातात झेंडे 
आपापल्या रंगाचे
उचलुनी जातीचे शस्त्र
 पेटवतायेत निखारे असमतेचे

हा वेडा समाज माझा 
पेटतच जाणार
ते वाहतील तसा 
वाहत राहणार
आता तरी थांबा जरा 
विचार करून बघा
माणूस आहात जरा, 
माणूस होऊन जगा