Monday, 23 December 2019

माझ्या कविता 36

सुखी जीवनाचं ज्ञान सारं
उगाच शोधतो काही 
सर्व असते तुझ्याच पाशी 
ही जाण तुला नाही

हातात फक्त झेंडे निराळे 
उगाच फिरतोस दारोदारी 
अर्थहीन प्रवास सारा 
अन् निष्फळ होतेय वारी 

जसे मृग असते अनभिज्ञ 
घेता शोध कस्तुरीचा 
भटकते उगाच रानोमाळी 
जे नसतेच काही त्याचा 

भुलविते तुला कोणी 
अशा मृगजळा पायी 
होईल अंधकार दूर 
कर निश्चय मनाचा ठायी 

शोधशील बरं देव 
कधी तुझ्या अंतःकरणात 
उघडून मनाची दारे 
बघ भेटेल तो माणसात

Wednesday, 27 November 2019

माझ्या कविता 39

कधी प्रवास नकळत माझा 
पुसलेल्या पाऊल वाटेवर 
भुलविते ओढ तुझी मला 
आठवणीच्या हिंदोळ्यावर 

थांबतो मी पण आता 
त्या वाटेवरून जाताना 
वेचतो फुले स्मरणातील फक्त 
तुला माझ्यात शोधतांना 

स्मरतो, रेखाटतो मनात 
बालपणीचे उनाड क्षण 
नव्हताच कसला हेवा-दावा 
फक्त निखळ मोकळे मन 

चाळतो पाने पुस्तकातील 
काही हृदयात साठलेली 
झाली आतुर अक्षरे आता 
माझ्या लेखणीतून टिपलेली 

जर नसतील पुसली अक्षरे 
या हृदयात उमटलेली 
शोधशील का तू?
या बंद पुस्तकात दडलेली

Sunday, 9 June 2019

माझ्या कविता 35

इतिहास तर विसरता येणार नाही
शूरवीरांच्या रक्ताने, त्यागाने लिहिलाय ना
जपली ना खरच त्यांनी ती संस्कृती अन तुलाही
म्हणे आधुनिकतेच्या युगात प्रगती झाली
मग कशाची?
खरच नको का आत्मचिंतन करायला

तू होतेय बर फक्त उपभोगाची वस्तू
बसलाय ना हर एक विवस्त्र करायला
काही तर म्हणतील ही बाजार बडवी
सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा नेहमीच मांडते
तूला या भर बाजारात विकण्यासाठी
खरेदीदाराची तर काही कमी नाही
लागतेच ना कधी गुप्त तर कधी उघड बोली
मग करतय कोण कसली पर्वा

अंतःकरण भरतं कधी
अन जीवही तूटतो सारखा
कशी पुसली असतील ती अक्षरे
लिहली होती त्या कणखर हाताने
श्वास गुदमरतोय अन त्याचाही बळी
घेतला जातोय
मरतोय ना तो वारसा अन इतिहास
झालं तर काही भूतकाळात, आजही
कदाचित घडेल ऊद्याही
नकोय कुणाला ऊद्याची फिकीर
स्वार्थानं बरबटलेला माणूस
आणखी विचार तरी काय करेन?
ऊघडा डोळे बघा नीट
अंधकार दूर करून नवीन ज्योत पेटता येते का?


Wednesday, 5 June 2019

माझ्या कविता 34

मोहक एका रम्य सकाळी 
गर्दी दाटली रवी किरणांची 
मंद झुळकेचा नाजूक स्पर्श 
जणू चाहूल लागे वसंताची 

लाल कोवळी सुंदर पाने 
अशी बहरली झाडावरती 
फांदीच्या त्या झोपाळ्यावर 
रानपाखरे गुंजन करती 

मनमोहक गंध मातीचा 
देहात विरून जातो 
बालपणीच्या गोड आठवणी 
ताज्या करून जातो 

कळ्या फूलात भ्रमर भरारी 
मकरंदाच्या शोधात 
पडलो मी ही आता 
या सुंदर सृष्टीच्या मोहात

Thursday, 30 May 2019

माझ्या कविता 33

असेल ताकद ऐकण्याची 
माझंही काही ऐकाल का?
सुखी होईल आयुष्य 
असं काही कराल का?

दिला कितीही पैसा-अडका 
लागलंच तर सोनं 
शेतकऱ्यांची अश्रू पुसले 
कोणी इतका पाऊस विकेल का?

दूषित हवा, दूषित पाणी 
जणू जीव तुटतो आहे 
जगता येईल मोकळं आता 
विचार कोण करणार आहे 

होऊ आता तरी जागे 
करू दुष्काळावर मात 
फुलवू वनराई धरतीवर 
होण्या सुखी प्राणिजात

माझ्या कविता 32

धरणी मातेचे लेकरू 
जगाचा पोशिंदा आहे बाप 

मिटवून जगाची भूक सार्‍या 
मात्र उपाशीच आहे बाप

रखरखत्या उन्हात घामानं नाहणारा
रात्रंदिन राबत असतो बाप 

फाटलेल्या संसाराला ठिगळं देत-देत 
सुखाची आशा बाळगणारा बाप 

आसमंत वादळे, दुःखाचे डोंगर झेलत 
वेळ काढणारा बाप 

फाटकीच कापडं, वा नसो पायात वहाण
तरीही समाधानानं जगणारा बाप 

सोडली जरी चामडी आपली 
त्याचे केले जरी पायतान 
उपकार मात्र फिटणार नाही 

भेटले बहुत सारे भेटतील ही 
 पण दुसऱ्यांसाठी झिजणारा 
फक्त आणि फक्त असतो बाप

Thursday, 2 May 2019

माझ्या कविता 31

निषेध! निषेध! करावा किती 
हा तर हल्ला भ्याड आहे 
बंदुकीच्या जोरावर हक्क मागणं 
हा तर मार्ग असुरी आहे 

इथे मरणारा प्रत्येक जीव 
आपला बांधव नाही का 
अनेकांना अनाथ करता 
याची शरम वाटत नाही का 

निष्पापांचे बळी घेता 
हे पाप कदापि मिटणार नाही 
संपवा लाल आतंक 
नाहीतर नरक सुद्धा मिळणार नाही

कितीही पेरा विष तुम्ही 
सत्य कधी मरत नसतं 
प्रत्येकाची वेळ येते 
तसं कर्मफळ मिळत असतं

Tuesday, 16 April 2019

माझ्या कविता 30

नको कसली भीती 
नकोच कसले दडपण 
अभिमानाने जगूया आता 
शूरभूमीचे वारस आपण 

किती असतील प्रलोभने 
वा असतील बरेच दावे 
झुकणार नाही लोकराज्य 
ते सामर्थ्यशाली व्हावे 

मोजली कितीही किंमत 
मोल मात्र होणार नाही
अनमोल मत माझे
ही लोकशाही हरणार नाही 

आम्ही सर्व खंबीर आता 
मोडेल पण वाकणार नाही 
पुरोगामी विचार आमचा
स्वाभिमान विकणार नाही

Monday, 4 March 2019

माझ्या कविता 29

हर वर्ण हर स्वर 
हर चराचर जीव तू 

तेजस्वी भास्कर कधी 
प्रेम शितल चंद्र तू 

ध्यान तू मन तू 
हर श्वास हर ध्यास तू 

कर्म तू प्रारब्ध तू 
कधी हार कधी जीत तू 

शांत मुद्रा एकाग्र कधी 
पाप विमोचन तांडव तु 

सामर्थ्य तू त्र्यलोक्य तू 
जन्म मृत्यूचा फेरा तू 

हर जीव हर शिव 
देवादिदेव महादेव तू

Saturday, 16 February 2019

माझ्या कविता 28

मी शोधत होतो
एक शांत किनारा
फसवीच वाट अशी
जीव तुटका होतो सारा

ओतला प्राण अवघा
ती समजू शकली नाही
वाटते कधी काळी
कि आपण चुकतो काही

दोन श्वासाचे अंतर
उमगेल का याचा अर्थ?
जर मिटेल हा दुरावा
तर नसेल ती वेळ व्यर्थ

घेशील समजून आता
सोडशील मग रुसवा
जुळून येण्यास मने
त्यागशील त्या आसवा

Friday, 1 February 2019

माझ्या कविता 37

हे अस्थिर दोन क्षण
सरतील ही आता
तेजस्वी प्रकाश वाटा
कधी दुःख प्रलय लाटा

काटेरी प्रवास सारा
अन् अंधुक सुखाचे वारे
लढतो आहे बेभान होऊन
सावरून दुःख सारे

माझे ही जीवन
नव्हतेच स्थिर काही
होईल ही अंत माझा
पण मिटण्याची खंत नाही

चमकेल मी ही आता
पचवून अपयश सारे
बहरेल मी ही कधी
जणू साक्षीस चंद्र-तारे

Sunday, 6 January 2019

माझ्या कविता 27

दिस येतो नि जातो
जीव होतो कासावीस
आस लागली एवढी
जणू चंद्राची चकोरास

माझा वारकरी बंधु
धुंद होतो भजनात
सुख दिसे त्याला
फक्त तुझ्या दर्शनात

आता तरी बरसु दे
 नको पाहूस तू अंत
भिजव हे रान सारं
मग मिटेल त्याची खंत

हो आनंद तू त्याचा
भागव त्यांची तहान
भुकेलेल्या पाखरांचा
वाचवशील तरी प्राण